Friday 20 February 2015

Devala Sakad -by Madhav Gogate


बाबारे रवळनाथा /बाबूलनाथा, आई जाखाई देवी, देवराई वाचवायला आम्हाक बुद्धि दे / शक्ती दे              

                          नदीच मूळ, ऋषीच कूळ शोधायला जाऊ नये म्हणतात; तशीच गोष्ट आहे देव रायांची; देवराया कोण्या माणसाने केंव्हा रुजवल्या हे सांगता येत नाही; ही स्थान निसर्ग निर्मित, स्वयंभू अशी! मानवी वस्ती वसू लागली त्या काळात, गावच्या जाणत्यांना गावापासून दूर, अनेकदा वेशीपाशी / डोंगर माथ्यावर / नदीतल्या बारमाही डोहापाशी / झर्याकाठी शांत, प्रसन्न वाटल, तिथेच देवत्व आहे अस त्यांनी मानून, ती जागा जपण्याचा परिपाठ मांडला, त्यास लोकमान्यता लाभली. त्यातूनच देवराईची प्रथा निर्माण झाली असावी. ओडीसा, छत्तीसगड राज्यातील कंधमाल, बस्तर भागातील आदिवासीबहुल क्षेत्रात, आजही गाव सीमेवर सारना, तर डोंगरावर निशाणी पहाड दिसतात. जिल्हा मुख्यालय असलेल्या कोरापुट  शहरात देखील अजून झेंडा पहाड ह्या जागी ग्राम देवता जोपासली जाते; तिथल्या पुजारी बाईला दर वर्षी शाल श्रीफळ देवून जिल्हाधिकारी सन्मानित करतात. अनेदा अश्या ठिकाणी तिथे देवाची मूर्ती देखील नसते, पण त्या जागेला पवित्र मानले जाते, पावित्र्य राखण्यासाठी जाण्या येण्यावर काही बंधने पाळली जातात.  रायगडा, कंधमालमध्ये दुर्गम भागात दौरा करतांना छोट्या जोड रस्त्यावरील घाटात, आपला प्रवास सुखरूप व्हावा अशी मनोकामना व्यक्त करून तिथे छोटा दगड ठेवायची वा झुडपाला चिंधी बांधण्याची प्रथा पाहिले आहे; अश्या तऱ्हेने छोटे छोटे दगड रचलेल्या वा झुडपाम्ना चिंध्या बाधून ठेवलेल्या जागाही पवित्र ठिकाण मानल्या जातात, या भागातील स्वाभाविक रित्या असलेली झाडे राखली जातात.

पश्चिम घाटातील देवराया संगोपनाची गरज

            तीस, चाळीस वर्षापूर्वी कै. वा. द. वर्तक यांच्या सारख्या व्यक्तींचे पुढाकाराने, प्रामूख्याने पश्चिम घाटातील देवराया, शास्त्रीयदृष्ट्या जैव विविधता संरक्षणाचे एक प्रभावी साधन कसे आहे, याबाबत अभ्यासपूर्ण लिखाण सुरु झाले. अशी ठिकाणे कुठे आहेत, त्या त्या क्षेत्राची खास विशेषता काय आहे व असे अनेक विषय तेंव्हा पासून ऐरणीवर आले. पण विकासाच्या नव्या वाटा, शहरी करण या सारख्या अनेक कारणांनी अश्या प्रथा, रूढी, परंपरा मागे पडायला लागल्याने, राई विरळ व्हायला लागल्याचे वा नष्ट होत असल्याचे जाणवू लागले. देवराईला निर्माण झालेले धोके पाहून, त्यातूनच अश्या जागांना भावी पिढीसाठी जतन करण्याची गरज भासू लागली. यात देवराई नसलेल्या जागांचाही समावेश होता; जसे जुन्नर तालुक्यातील हिवार्याला एका ब्रिटीश अधिकाऱ्याने निर्मिलेल्या उद्यानास, बुडीत होण्यापूर्वी  वाचविण्यासाठी झालेले अयस्वी प्रयत्न).

वन विभागाने महाराष्ट्रातील देवरायांचा त्वरित आढावा घेवून, या विषयाचा सांगोपांग विचार करून, दूरगामी स्वरूपाची संवर्धनासाठीची उपाय योजना काय असावी, याबाबतचा सल्ला देण्यासाठी, बी.एन.एच.एस या संस्थेची सन १९९३ चे सुमारास सल्लागार म्हणून नेमणूक केली; त्यानुसार संस्थेने अभ्यास करून त्याबाबत शिफारशी केलेल्या आहेत. पण त्या अनुषंगाने फार काही अंमलबजावणी झालेली नाही. ह्या विषयात रुची असणारे अनेक लोक /संस्था आज पुण्यात आहेत; त्या सर्वांचा कानोसा घेता अस दिसत की देवराई राखण्याच महत्व सर्व सामान्यांना पटलेलं असल तरी देवरायांचा ऱ्हास झपाट्याने होतोच आहे व ही एक गंभीर बाब आहे; त्यावर तातडीने उपाययोजना करायलाच हवी.

माझ देवाला साकड

          कोकणात आपल्या गावी, घरच्या दारच्या अनेक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी, एक सर्व मान्य उपाय म्हणजे देवाचा कौल घ्यायचा! जसा आम्ही कोर्टात आपली अडचण, आपत्ती काय आहे, त्यातून कसा काय न्याय मिळावा हे नीट मांडून, त्यावर पर्याय दाखवून, त्यातला  योग्य तो मार्ग सुचविण्यासाठी वकिल नेमतो, तसाच देवासमोर बसून गार्हाण मांडायला/ केस समजावून सांगायला, भगत वा पुजारी नेमला जातो. तो मग आपल गार्हाण मांडून, त्यातून सुटका मिळावी, सर्वांच भल होवो, या करिता काय करायला पाहिजे, याचा कौल मागयला देवाच्या डोक्यावर फूल ठेवतो; मनात योजल्याप्रमाणे फूल उजवी वा डावी कडे पडल्यास, काम होणार की नाही ह्याचा, नशिबाचा निर्णय, तो आपल्याला सांगतो. मनासारखा कौल लागलीच नाही मिळाला तर, परत परत गार्हाण आळवतो; त्यातून समाधान नाही झाल तर परतून चांगला दिवस पाहून, परत नशीब आजमावतो.

        देवराई वाचविण्यासाठी आता मी भगत बनून जनतेचा कौल मागण्यासाठी मी जनता जनार्दनाकडे, एकदाच नव्हे तर गरज पडल्यास परत परत मनासारखा कौल मिळे पर्यंत, साकड घालणार  करणार आहे.

सर्व प्रथम देवराईला धोका कोणापासून व कसा होतो हे पाहूया;

१.      पारंपारिक देवराईतील “देवपण”च माझ्यामते पहिला धोका आहे. अमूर्त अश्या दैवीपणाला मूर्तित पाहू लागले की त्या मूर्तिची पूजा होवू लागते; कोणी देवासमोर पैसा वाहतात मूर्तिला आभूषणे मिळतात, म्हणून तीच मूर्ति मंदिरात बंदिस्त होते!! तिला नैवेद्य होवू लागतो, मूर्ति समोर एक दान पेटी येते; बघता बघता जत्रा उत्सव सोहळे करायला पुजारी लागतो आणी पहाता पहाता, देवाचाच व्यापार होऊ लागतो; जागेचे पावित्र्य मंदिरापुरतेच सिमीत केंव्हा होत, तेच कळतच नाही.

२.      मंदिरात बंदिस्त केलेल्या देवाच्याच नावाने, मंदिर अधिक आकर्षक करण्यासाठी वा भाविकांच्या सोयीसाठी, पाय वाट, देवाच्या दारी क्षणभर टेकायला पार, अशी सुरवातिची, परिसराचा अल्प ऱ्हास करणारी कामे, भस्मासुराचे रूप भयानक स्वरूप कसे घारण करून, परिसरच नष्ट करतात हे कोणाला सांगूनही त्याचा त्यावर विश्वास बसणार नाही.

३.      देवस्थान कमिटीने देवस्थानाचा कारभार, (देवास स्मरून) स्थान महात्म्य लक्षात घेवून करणे अपेक्षित आहे. एका मंदिराचे विश्वस्तानीच मंदिराला संगमरवरी पायरी करण्याच्या उदात्त हेतूने निधी उभा करण्यासाठी परिसरातील झाडे तोडायचा/ त्यापासून कोळसा पाडण्याचा ठेकाच दिलेला होता. कुंपणच शेत खाऊ लागल तर त्याला कोण थांबवणार? मात्र विश्वस्तांवर धर्मादाय आयुक्त यांचा अंकुश असू शकतो; ह्या संस्थेचा वापर करवून देव राई वाचवायला मदत कशी घेता येईल, हे तपासायला हव.

४.      बऱ्याच ठिकाणी देवराया (सरकारी) राखीव वनात आहेत; मात्र सरकारी कागद पत्रात त्या क्षेत्रावर कोणाचेच हक्क नसतात, अगदी देवाचेही. तेथील स्थावर वा जंगम मालमत्तेची नोंद लेख्यात असते, पण क्षेत्रीय अध्यात्मिक स्थानमहात्म्याची नोंद केवळ अपवादानेच आढळून येते. त्यामुळे काय होत की “विकासासाठी,” क्षेत्रीय “मूल्य वर्धनासाठी” तिथे साफ तोड होवून, एकसुरी पण जास्त उत्पन्न देण्यार्या अगदी विदेशी वृक्ष प्रकाराची देखील लागवड होऊ शकते.

अश्या जागेचा उपयोग इतर कामासाठी करावयाचा असेल तर वनसंवर्धन कायद्यानुसार काय गमावीणार आहोत याचा धांडोळा घेताना, फक्त लेखी माहितीचाच आधार धेतल्या गेल्यास अनावधानाने देवराई नष्ट होऊ शकते.

५.      महसूल विभागाचे नियंत्रणात असलेल्या वा खाजगी मालकी क्षेत्रातील झाडोरा तोडायला महाराष्ट्र वृक्ष तोड अधिनियम अंर्तगत तसेच इमारती लाकडाची वाहतूक करण्यासाठी भारतीय वन कायदा १९२७ प्रमाणे पूर्व परवानगी घेणे अपेक्षित असते. बऱ्याच प्रकारच्या महत्वाच्या प्रजातींचा अधिनियमाचे परिशिष्टात समावेश असल्याने, जागरूक नागरिकाने लक्ष ठेवल तर, वृक्ष तोडीवर आळा घालणे शक्य आहे.

६.      वरीलप्रमाणे ३ ते ५, हे केवळ प्रतिबंधात्मक उपाय ठरतात. पण जन जागृती वा विश्वस्त मंडळास त्यांचे जबाबदारीची जाण / प्रशिक्षण / मदत, हेही महत्वाचे उपाय आहेत. त्यांचाही विचार खालील प्रमाणे व्हावा.

अ] जैव विविधता कायदा, २००४, नुसार जैवसंवर्धनासाठी ग्राम पातळीवरील समित्या स्थापन करून त्यांचे मार्फत काम होणे अपेक्षित आहे. ही समिती सुयोग्य क्षेत्रास “नैसर्गिक वारसा क्षेत्र” घोषित करून त्याचे लोक सहभागातून चिरस्थाई संवर्धन व्यवस्था करू शकते.

ब] आदिवासी बाहूल क्षेत्रात स्थानिक रिती रिवाजानुसार अनेक देवराई आहेत पण अश्या भागाचा अजूनही सखोल अभ्यास झालेला नाही [नाशिक, धुळे, नंदुरबार,अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचीरोली इत्यादी].

सन १९९६ साली घटनेच्या सहाव्या परिष्टात नमूद केलेल्या आदिवासी क्षेत्रात, पंचायत राज व्यवस्था लागू झाल्यावर ( पेसा कायदा), ग्राम सभेच्या अखात्यारात येण्यार्या भागात, नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर स्थानिक रितीरिवाजा प्रमाणे करण्यास सभेला सक्षम केलेले आहे. नैसर्गिकसाधन संपत्तीचा वापर कसा व्हावा हे ठरवायला शासकीय यंत्रणेचे मदतीने व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी व  त्यानुसार योजना अंमल बजावणी एक उप समिती प्राधिकृत आहे.

या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने मार्च २०१४ मध्ये नियम बनविले आहेत.

क] वन्य जीव (संरक्षण) कायदा, १९७२ मध्ये राखीव वनात लोक सहभागाने संवर्धनासाठी क्षेत्र राखण्याची व्यवस्था करता येते [कान्झेरवेशन रिझर्व] तसेच सामुहिक मालकीचे क्षेत्रात कम्युनिटी रिझर्व स्थापन करण्याची तरतूद आहे.

                           मी माधव, गणेश गोगटे चा झील,  जनता जनार्दनाला साकड घालतो की, बाबानु सर्व गाववाल्यांना, मुंबईच्या चाकर मान्यांना, गावचे पुढार्यांना, देवस्थानचे विश्वस्त मंडळींना, वन विभागाचे कर्मचार्यांना / इतर सरकारी अधिकार्यांना, पुण्यातल्या व इतर ठिकाणच्या सेवाभावी संस्था, अभ्यासक, अश्या सगळ्या सर्वांना, देवराई वाचवायला सुबुद्धी दे, त्यांना सबळ कर रे बाबा !!











माधव गोगटे, निवृत्त वनसेवक,

७०४ कुमार पुष्पक, एन.आय. बी. एम रोड, पुणे.

No comments:

Post a Comment